नाशिक : महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत उभारलेल्या घरकुलांमध्ये अनेक ठिकाणी पोटभाडेकरू असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाने केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत विधी समितीच्या सभेत गांभीर्याने चर्चा होत संबंधित लाभार्थींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सभापती शीतल माळोदे यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. विधी समितीच्या सभेत मनपाच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये तसेच घरकुलांमध्ये असलेल्या पोटभाडेकरूंबाबतचा विषय चर्चेला आला असता, सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभापतींच्याच प्रभाग क्रमांक २ मध्ये पंचवटीतील निलगिरी बागेमधील घरकुलांचा सर्व्हे केला असता त्याठिकाणी २५ पोटभाडेकरू आढळून आले होते. संबंधित लाभार्थींना महापालिकेने ३ डिसेंबर २०१७ रोजी नोटिसा बजावल्या. परंतु, त्यांचा खुलासा मागविण्याचा कालावधी मात्र नोटिसीत न टाकण्याची चतुराई केली. नोटीस बजावून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने त्याबद्दल कारवाई केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित लाभार्थींविरुद्ध तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. संतोष गायकवाड यांनीही घरकुलांमध्ये सर्रास पोटभाडेकरू भरले जात असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला. घरकुल योजनेप्रमाणेच महापालिकेच्या गाळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पोटभाडेकरू असूनही त्याबाबत कारवाई केली जात नसल्याचे शीतल माळोदे यांच्यासह नीलेश ठाकरे, उपसभापती राकेश दोंदे, प्रा. शरद मोरे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी विविध कर विभागाचे अधिकारी एस. एस. आहेर यांनी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आयुक्तपदाच्या काळात महापालिकेच्या गाळ्यांचा सर्व्हे झाला होता, त्याबाबतचा अहवाल अंतिम कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. यावेळी सभापतींनी पुन्हा एकदा नव्याने सर्व्हे करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी, नव्याने झालेले डीपीरोड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती हिमगौरी आडके-अहेर यांनी विचारली. परंतु, कनिष्ठ अधिकाºयांना त्याबाबतचे समाधानकारक उत्तर देता न आल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. सभेला नयन गांगुर्डे, पूनम मोगरे या सदस्यही उपस्थित होत्या.अधिकारी आयुक्तांच्या बैठकीलाविधी समितीची नियोजित सभा सकाळी ११.३० वाजता होती. परंतु, त्याचवेळी आयुक्तांनी अंदाजपत्रकासाठी अधिकाºयांची बैठक बोलावल्याने सभेकडे सुमारे दीड तास कुणीही फिरकले नाहीत. अखेर सहायक नगरसचिवाने जे उपलब्ध असतील त्या कनिष्ठ अधिकारी-कर्मचाºयांना बोलावून घेतले. परंतु, त्यांना सदस्यांच्या प्रश्नांना नीटसी उत्तरे देता आलेली नाहीत. त्याबद्दल शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी संताप व्यक्त केला.सभापती शीतल माळोदे यांनीही विधी समितीची बैठक असल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले नाही काय, असा सवाल करत आयुक्तांनाच समितीच्या बैठका कशा होतात यासाठी बोलावले पाहिजे, असा टोमणा मारला. पूनम मोगरे यांनी तर समिती केवळ नावापुरतीच असल्याने बरखास्त करून टाकण्याची सूचना केली
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान घरकुलांमध्ये पोटभाडेकरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:28 AM