लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबईत क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फे काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिकरोड मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रविवारी (दि.६) नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा नगरसेवकांसह अन्य लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेऊन परिसरातील मराठा समाज बांधवांना मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मूक मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेल्या सकल मराठा समाजाने आता राज्यात धडक देण्याची तयारी केली आहे. मुंबईतील या राज्यस्तरीय मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरासह जिल्हाभरातील विविध भागातून बैठका, बाइक रॅली काढण्यात येत आहे. अशाच प्रकारे नाशिकरोड परिसरात रविवारी बाइक रॅली काढून मराठा क्रांती मोर्चाच्या स्वयंसेवकांनी जनजागृती केली. सकल मराठा समाजातील तरुणांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही रॅलीत सहभागी होत नाशिकरोड, जेलरोड, देवळाली गाव, विहितगाव परिसरातील मळे अशा वेगवेगळ्या भागातून बाइक रॅली काढून मराठा समाजातील कुटुंबीयांसोबत संवाद साधून मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. मुक्तिधामजवळील महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ च्या मैदानापासून देवळाली गाव, विहितगाव, सुभाषरोड, सिन्नर फाटा, सामनगावरोड, चेहेडी, बिटको चौक, दत्तमंदिर चौक, गंधर्वनगरी, जलरोड, नांदूर नाका आदी मार्गांवरून मार्गक्र मण करीत जेलरोड परिसरातील भगवती लॉन्स येथे शिवशाहीर स्वप्नील ढुमरे यांच्या पोवाड्याने रॅलीचा समारोप झाला.
नाशिकरोडमध्ये जनजागृती बाइक रॅली : मुंबई मराठा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 19:57 IST