सायखेडा : गोदाकाठ भागातील नागरिकांना नेहमी भेडसावणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर नवीन गेट आणि धरणातील गाळ काढून साठा वाढविण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यासाठी हिरवा कंदील दाखविला असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले ते शिंगवे येथे बोलत होते.
गोदावरी आणि दारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असली की नदीला पाणी वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, या गावांना पुराचा वेडा बसतो. शेती पाण्याखाली जाऊन पिके खराब होतात, जमीन नापीक होते, हंगाम वाया जातो. दुकानात पाणी जाते. व्यवसाय बंद पडतात. व्यापारीवर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान होते. यासाठी पर्याय म्हणून धरणावरील पाणी वाहून जाईल अशा गेटची संख्या वाढली पाहिजे आणि धरणाच्या गेटअगोदर काही अंतरावर नदीत असणारा गाळ बाहेर काढून पाण्याच्या क्षमतेत वाढ करणे हे दोन्ही पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. जेव्हा दोन्ही कामे होतील तेव्हा पाणी नदीत वाहून जाईल आणि पुराचा धोका टळेल, पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, शेती आणि पिके यांची नासाडी होणार नाही, घरे पाण्याखाली जाणार नाहीत, व्यवसाय सुस्थितीत राहातील.
यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यामार्फत मोठा निधी आणून प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सागर कुंदे, धोंडीराम रायते, भगीरथ गिते, भूषण शिंदे, विजय कारे, गणेश खेलूकर, राजेंद्र कुटे, राजेंद्र सांगळे, वसंत जाधव, मंगेश राजोळे, संजय डेर्ले उपस्थित होते.