नाशिक : महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने नसल्याचा पुनरुच्चार करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत गेल्यानंतर मराठी कलावंतांनाही उतरू न देणाऱ्या महाराष्ट्र सदनाच्या कारभाराचीच चौकशी करा, अशी मागणी केली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाच्या आढावा बैठकीसाठी आलेले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. महाराष्ट्र सदन आणि नाशिकचे नाते आहे, असा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा थेट नामोल्लेख न करता ठाकरे यांनी सांगून या सदनाच्या बांधकामाबाबत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे सदनाचे ठेकेदार कोण होते, या मुद्द्यांचीही चौकशी पुढे झालीच पाहिजे. महाराष्ट्र सदनात मध्यंतरी मराठी कलावंतांनाही उतरू देण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे मराठी माणसाला महाराष्ट्र सदनातच अशी वागणूक मिळत असेल, तर महाराष्ट्र सदनाऐवजी लॉजिंग-बोर्डिंग नाव द्या, असा उपरोधीक सल्लाही ठाकरे यांनी दिला. तसेच सदनातील या कारभाराबद्दल आयुक्त बिपिन मलिक यांच्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्वीच्या राजपत्रात चूक झाली आहे. त्यात ध चा मा झाला असून, ही चूक सुधारली गेली पाहिजे. या समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी माजी मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित, तसेच धुळ्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक सतीश महाले यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन धागा बांधून त्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र सदन कारभाराची चौकशी करा : ठाकरे
By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST