नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर करण्यात आलेल्या तीन लाखांच्या मोऱ्यांची कामे निकृष्ट दर्ज्यांची असून, जिल्हा परिषदेची परवानगी नसतानाही ती कामे कशी झाली, याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे केली.यासंदर्भात आमदार जयंत जाधव यांनीही लेखी पत्राद्वारे तक्रार केल्याचे गोरख बोडके यांनी सुखदेव बनकर यांना सांगितले. त्यानंतर तत्काळ या तक्रारींची शहानिशा करून असे घडले आहे काय? त्याची चौकशी करून अहवाल सादर करायचे आदेश सुखदेव बनकर यांनी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दिले आहेत.आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासंदर्भात आपण लेखी तक्रार केल्याचेही गोरख बोडके यांनी सुखदेव बनकर यांना सांगितले. ही कामे निकृष्ट दर्ज्याची झालेली असून, सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या कामांची गुणवत्ता व दर्जा ढासळल्याचा आरोप यावेळी गोरख बोडके यांनी केला. यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गोरख बोडके यांनी सुखदेव बनकर यांना सोमवारी (दि.१६) भेटून केली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने संबंधित ठेकेदारांची धावपळ उडाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेची परवानगी न घेताच तसेच मोर्यांसाठी आवश्यक असलेली भौगोलिकदृष्ट्या साईट नसतानाही अशा ठिकाणी तीन लाखांच्या आतील मोर्यांची कामे केली आहेत.