नाशिक : संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या इनसिंक चॅनलचे कार्यालय तसेच शास्त्रीय संगीताच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल कम्युनिटी आॅफ इंडिया (जीसीआयएम)च्या कार्यालयाचा शहरात प्रारंभ करण्यात आला़ या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील संगीत कलावंतांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची माहिती इनसिंक टीव्हीचे कार्यकारी संचालक रतीश तागडे, तसेच प्रसिद्ध तबलावादक पं़ विजय घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़मेघदूत शॉपिंग सेंटर येथे आज इनसिंक टीव्ही व ग्लोबल कम्युनिटी आॅफ इंडियाच्या कार्यालयाचा प्रारंभ घाटे व तागडे यांच्या हस्ते करण्यात आला़ याचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून बाबाज् थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे हे काम पाहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ तागडे म्हणाले, भारताच्या अभिजात कला असलेल्या शास्त्रीय संगीतासाठी राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर योग्य व्यासपीठ निर्माण करण्यासाठी इनसिंक चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे़ इनसिंक केवळ कार्यक्रम प्रसिद्ध करत नसून प्रत्यक्ष शास्त्रीय संगीताच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे़ यातूनच देशातील शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल कम्युनिटी आॅफ इंडिया (जीसीआयएम)ची स्थापना करण्यात आली आहे़ या माध्यमातून शास्त्रीय संगीतातील नवकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवकलाकारांसाठी प्रसिद्ध कलाकारांचे मार्गदर्शन, कार्यशाळा, नृत्य मार्गदर्शन, सादरीकरणांचे आयोजन करून त्यांना शास्त्रीय संगीतातील सखोल ज्ञान देणे, शास्त्रीय संगीतातील श्रोत्यांना एकत्र करणे, तसेच नव्या पिढीला सोप्या पद्धतीने शास्त्रीय संगीताची माहिती देऊन शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ इनसिंक टीव्ही चॅनल १५ आॅगस्ट २०१३ पासून सुरू झाले असून, त्याचे देशभरात चांगले प्रसारण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ सॅटेलाईटसह लवकरच डिजिटील प्लॅटफॉर्म डिसेंबरअखेर सुरू होणार असून, हे चॅनल संपूर्ण जगात दिसणार आहे़ त्यामुळे सर्व शहरांतील नवकलाकारांना जागतिक स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध असणार आहे़ शहरात सुरू झालेल्या इनसिंकच्या कार्यालयात नवकलाकार आपली सीडी तसेच डीव्हीडी देऊ शकतात़ तज्ज्ञ कलावंतांची समिती त्याचे परीक्षण करून या कलाकारांचा कार्यक्रम इनसिंकवरून प्रसारित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे तागडे यांनी सांगितले़ पत्रकार परिषदेला प्रशांत जुन्नरे, आर्ट आॅफ लिव्हिंगचे संजय बडवर, अॅड़ विजया माहेश्वरी, सुधीर कुलकर्णी आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
संगीत कलावंतांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार
By admin | Updated: November 17, 2014 01:27 IST