त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ अनुदानाच्या रकमेचे व्याज एक कोटी ३८ लाख २५ हजार ३६५ रुपये त्र्यंबकेश्वर पालिकेच्या गंगाजळीत जमा न होता परत शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही रक्कम त्र्यंबकेश्वर पालिकेच्या अनेक विकासकामासाठी खर्च करण्याची परवानगी मिळावी असे पत्र सहा महिन्यांपूर्वीच पालकमंत्र्यांना पाठविले होते पण नकार मिळाला होता. अशी माहिती नगराध्यक्ष विजया लढ्ढा व त्यांचे पती दीपक लढ्ढा यांनी सांगितली. सिंहस्थ कुंभमेळा सन २०१५-१६साठी विकासकामे करण्यासाठी शासनाने ज्या ज्या यंत्रणा नियुक्त केल्या होत्या त्यापैकी त्र्यंबकेश्वर नगरपालिका ही एक यंत्रणा होती. शासनाने विकासकामांसाठी अनुदानाची जी रक्कम पालिकेकडे पाठविली होती त्यापैकी काही रक्कम देना बँकेत व काही रक्कम बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ठेवली होती. त्या बँकांतून व्याजापोटी वरील रकमेचे धनादेश त्र्यंबकेश्वर पालिकेला प्राप्त झाले आहेत. आज ठेकेदारांची जवळपास बहुतेक बिले देण्यात आली आहेत असे समजले.त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला सिंहस्थ विकासकामांसाठी रु. ४७ कोटी ४८ लाख अनुदान प्राप्त झाले होते. वास्तविक अनुदान विकासकामांसाठी मिळते. त्याची परतफेड करायची नसते. तरीदेखील व्याजाच्या रकमेवर पालिकेचा हक्क नाही. हे जरा विचित्रच वाटते. पालिका प्रशासनाने या संदर्भात लक्ष घालून पालिका विकासकामांसाठी ही रक्कम पालिका फंडात वर्ग करून घेण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून परवानगी मिळवावी. तसेच मंत्री स्तरावर किंवा सिंहस्थ शिखरे समितीची परवानगी मिळविण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक मिळून एकमताने प्रस्ताव करून प्रत्यक्ष शिष्टमंडळ घेऊन जाण्यास तयार आहोत, असे गटनेते रवींद्र सोनवणे यांनी सांगितले. (वार्ताहर)
अनुदान रकमेचे व्याज शासनाकडे परत जाणार !
By admin | Updated: March 23, 2017 21:39 IST