सिन्नर : पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाच वर्षांपासून शेतीचे सरासरी उत्पादन खालावल्याने हाती पैसाच उरला नाही, त्या अवकाळी पावसाने या संकटात भर टाकल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी पुन्हा सोसायट्या, सावकारांकडे पदर पसरावा लागत आहे. या प्रयत्नालाही फारसे यश मिळत नसल्याने शेत मशागतीचा वेग संथ झाल्याचे दिसून येत आहे.नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणाऱ्या दरामुळे शेतकरी पिचला आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काडीचीही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण मात्र वाढले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच झाल्याचे चित्र आहे. आधी दुष्काळ त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे सरासरी उत्पादन घसरले आहे.शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न यामुळे त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. पावसाळा एक महिन्यावर आला असतानाही शेतात शेतकऱ्यांची वर्दळ फारशी दिसून येत नाही. उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतजमीन तापावी यासाठी शेतकरी एप्रिलमध्येच नांगरणीच्या कामांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात करतो. पण यंदा एप्रिल उलटून मे महिना लागला तरी शेतात बैलांच्या गळ्यातील घुंगरू ऐकू येईनासे झाले आहे तर ट्रॅक्टरचाही आवाज मंदावल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
अनिश्चित पाऊस : खर्च होऊनही उत्पादन कमी
By admin | Updated: May 9, 2015 22:57 IST