नाशिकचा उपयुक्त जलसाठा २१ टक्के
नाशिक : जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याने तळ गाठला आहे, तर चार तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धरणांची पाणीपातळी कमी होत असल्याने वेळेत पाऊस बरसला नाही, तर पाणी कपातीचे संकट निर्माण होऊ शकते. जलसाठ्याच्या आकडेवारीनुसार १६ जून रोजीचा उपयुक्त जलसाठा २१.३८ टक्के इतका असून, मागीलवर्षी या तारखेला २५.३१ टक्के इतका होता.
विघ्नहर्तानगर येथे वृक्षलागवड
नाशिक : उपनगर येथील अक्षरधाम सोसायटीमधील विघ्नहर्तानगर येथे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. नगरसेविका सुषमा पगारे यांच्या संकल्पनेतून प्रभागात औषधी वृक्षरोपे लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने काॅलनी, सेासायटी परिसरात रोपांची लागवड केली जात आहे. याप्रसंगी संदीप येवले, रमेश शिंपी, संजय हांडे, मंगला क्षत्रिय, मंगला चव्हाण, कीर्ती सूर्यवंशी, हॅप्पी सिंग, कुणाल पगारे आदींची उपस्थिती होती.
शाळेच्या पहिल्या दिवसाची ध्वजारोहणाने सुरुवात
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील नूतन त्र्यंंबक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य कुणाला गोराणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उपप्राचार्य आर.के. पवार, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.बी. बोरसे यांनी केले. बुधवारपासून ऑनलाइन शैक्षणिक वर्गाला सुरुवात झाली.
युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर
नाशिक : पंचवटीतील गजानन चौक येथे युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात आले होते. उपजिल्हाप्रमुख रूपेश पालकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे आदींची उपस्थिती होती.
सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये ऑनलाइन उद्बोधन
नाशिक : सिडकोतील आश्विन येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये माध्यमिक विभागातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व शिक्षकवृंदाकरिता अध्यापन काल ऑनलाइन पद्धतीने पार पडले. मुख्याध्यापक माधुरी कसबे यांनी शिक्षकवृंदांचे स्वागत केले. नवीन शैक्षणिक वर्षाची वाटचाल आणि आव्हाने याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. कामकाजाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले. संंस्थेच्या संस्थापक सुमन दत्ता, विजयकुमार दत्ता व नलिनी दत्ता आदींची उपस्थिती होती.
निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात
नाशिक : पतियाळा, पंजाब येथे राष्ट्रीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात २३ जुलै ते ०८ ऑगस्टदरम्यान टोकियो जपान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड करण्यासाठी बुधवारपासून स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील सिन्थेटिक ट्रॅकवर निवड चाचणी घेतली जात आहे.
नाशिक : सवंगडी संस्था, नाशिक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकपात्री पथनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे.
कोरोनामुळे या स्पर्धेचे आयोजन दृक्श्राव्य माध्यमातून करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी वय वर्षे ७ ते १० व वय वर्षे ११ ते १४, असे दोन गट असतील.