नाशिक : भद्रकालीतील व्हिडीओ गल्लीत छापा टाकून पोलिसांनी पकडलेल्या गांजातील तिघा संशयितांच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायाधीश एऩ के.ब्रह्मे यांनी दोन दिवसांची वाढ केली आहे़ या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या तिघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, यातील प्रमुख संशयित मंगेश शेलार व कुणाल शेलार हे अद्यापही फरार आहेत़पोलीस उपआयुक्त एऩ अंबिका यांनी २५ नोव्हेंबरला सकाळी भद्रकालीच्या व्हिडीओ गल्लीतील शेलारवाडा व तलवाडी या दोन ठिकाणी छापा टाकून ९९ किलो भांग व ९ किलो गांजा जप्त केला होता़ या प्रकरणी संशयित अजय जगबंधु महंतो, विजय शंकर गांगुर्डे, गणपत बंडू सहाळे या तिघांना अटक करण्यात आली होती़ या तिघांना न्यायालयात हजर केले असता १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती़ या तिघा संशयितांनी पोलीस कोठडीदरम्यान फरार असलेले मंगेश व कुणाल शेलार, तसेच या व्यवसायासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींबाबत उपयुक्त माहिती न दिल्याने पोलीस कोठडी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी भद्रकाली पोलिसांनी केली होती़ त्यानुसार या तिघांना मंगळवारी (दि़ १) विशेष न्यायालयात हजर केले असता ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)
गांजा छाप्यातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Updated: December 2, 2015 22:22 IST