नाशिक : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड १९ साथरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या फेरीमध्ये आरोग्य अधिकारी, तसेच कर्मचारी यांना हा लसीकरणाचा लाभ देण्यात येत आहे. मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १० अतिरिक्त केंद्रे वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
ज्या लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ घेता आला नाही किंवा जे लाभार्थी लसीकरणसाठी केंद्रावर आले नाहीत या सर्वांची कारणे लक्षात घ्यावी आणि या लसीकरण मोहिमेची व्यापक जनजागृती करावी आणि ही लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित कोविड-१९ लसीकरण कृती दल समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांच्यासह जिल्हा कृती दल समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, पहिल्या फेरीसाठी आपण १३ केंद्रांचे नियोजन केले होते; पुढच्या फेरीसाठी आपण आणखी दहा लसीकरण केंद्र वाढवत आहोत. त्यामध्ये मविप्र वैद्यकीय महाविद्यालय, धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय, देवळाली येथील कॅटोन्मेंट सामान्य रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय दोन, मालेगाव येथील सामान्य रुग्णालय दोन, त्र्यंबक येथील उपजिल्हा रुग्णालय, मनमाड उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय आणि सटाणा येथील ग्रामीण रुग्णालय यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात २३ जानेवारीअखेर आपण ४ हजार ४७४ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत पहिली फेरी सुरू राहणार आहे. सर्वांनी प्रयत्न करून प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून लसीकरणाचा लाभ देण्यासाठी नियोजन करावे. कोणाच्या मनात याबाबत भीती असेल तर त्याबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी नमूद केले.