सिडको : दुचाकीचालकास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून घेत पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख रुपये लुटून नेल्याची घटना रविवारी (दि़३) सकाळी गोविंदनगर परिसरात घडली़ सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अन् वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे़ शहरात काही दिवसांपासून लूट, चेनस्नॅचिंगच्या घटना घडत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सिंहस्थनगर परिसरात राहणारे शैलेंद्र बारी हे एका दैनिकाच्या वितरण विभागात काम करीत असून, दररोज पहाटे शहरातील महात्मा गांधी रोडवर स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्यांना वृत्तपत्र देण्याचे काम करतात़ वृत्तपत्र विक्रीतून जमा होणारी रक्कम सकाळी अकरा वाजेपर्यंत वृत्तपत्राच्या कार्यालयात जमा करतात़ रविवारी सकाळी वृत्तपत्रविक्रीतून जमा झालेली सुमारे एक लाख पाच हजार रुपयांची रोकड घेऊन दुचाकीने ते घरी जात होते़ सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शैलेंद्र बारी स्कुटी दुचाकीने (एमएच १५, ईआर ५८२३) गोविंदनगर परिसरातील कर्मयोगीनगरच्या राज बंगल्यासमोरील रस्त्याने जात होते़ त्यावेळी पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबविले, तर पल्सरवर पाठीमागे बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने बारी यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून पळ काढला़
एक लाख रुपये लुटून नेल्याची घटना
By admin | Updated: May 4, 2015 01:17 IST