येवला : तालुक्यातील रास्ता सुरेगाव येथील जिल्हा परिषद संगणकीकृत शाळेचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषदेच्या शाळा या मुलांचा पाया घडविणारे मंदिर असून, विचाराचे, संस्कृतीचे दर्शन प्रथम येथेच मिळते, असे प्रतिपादन पंचायती समिती साभापती प्रकाश वाघ यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब डमाळे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जगताप, विनायक वाव्हळ प्रमुख मान्यवर हजर होते. या वेळी वाघ पुढे म्हणाले, की संगणकामुळे बुद्धीचा विकास होतो. कौशल्य वाढते, संगणकीकृत झालेल्या शाळा यशाच्या शिखरावर निश्चित जातील तेव्हा खेड्यातील विद्यार्थी जिल्हाधिकारी व अन्य पदावर विराजमान होईल. सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब डमाळे म्हणाले की, ग्राम सहभागातून गाव व शाळांचा विकास साधला जात आहे. विचारधारा व सामाजिक ज्ञान शिक्षकाना आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकासाकरिता ते झटतात. म्हणून या शाळेतून भावी चांगली पिढी निश्चित तयार होईल. यावेळी डमाळे यांनी रोख स्वरूपात देणगी दिली. सुरेगावची शाळा आदर्श करा. संगणकीकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळेल. आधुनिक युगात अधुनिक पद्धतीने घेतलेल्या शिक्षणामुळे कोतवाल ते पंतप्रधानापर्यंत यशस्वी होता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक नीलिमा थोरात यांनी केले. आभार बाबासाहेब भागवत यांनी मानले. शरद पवार यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी सरपंच बाबासाहेब पवार, माजी सरपंच रावसाहेब मगर, कचरू चव्हाण, वाल्मीकी मगर, पोलीसपाटील शब्बीर शहा, प्रकाश गायके, मढवईसर, मयूर पवार, मगर सर आदि मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक फतू सय्यद, दीपक राम वंजारी, नीलिमा थोरात, सुरेखा हजारे, संगीता बनसोडे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
संगणकीकृत शाळेचे उद्घाटन
By admin | Updated: October 25, 2016 00:36 IST