सिडको : महापालिका प्रभाग क्र. ४९ मध्ये स्थानिक विकास निधी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार विरंगुळा केंद्रासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचा सामाजिक उपक्रमांसाठी ताबा मिळावा, या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ जय जगदंब संघाच्या सदस्य ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी उपाशीपोटी ज्येष्ठांनी अडगळीत पडलेल्या सभागृहातील मद्याच्या रिकाम्या बाटल्या, केरकचरा हटवून स्वच्छता केली. कामटवाडे भागातील आनंदनगर येथे असलेल्या सभागृहासमोर संघाचे अध्यक्ष तुळशिराम इप्पर, सचिव विठ्ठल चौधरी, हरिभाऊ पटेकर, प्रभाकर मोरे, मधुकरराव शेंडे, लक्ष्मण मानकर, पंडितराव मोरे, बाळासाहेब मटाले आदिंसह पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी राष्ट्रपित्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली अर्पण करीत उपोषण सुरू केले. शिवसेनेचे महानगर समन्वयक दिलीप दातीर यांनी उपोषणार्थी ज्येष्ठांची भेट घेऊन सभागृहाचा ताबा संघाकडे मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मनपा सर्व्हे क्र. २२/२अ या भूखंडावर संघाचे सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला-पुरुषांच्या मागणीवरून तत्कालीन आमदार नितीन भोसले यांच्या आमदार निधीतून वरील विरंगुळा केंद्रासाठीच्या सभागृहाचे काम गेल्या ३० डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण झालेले आहे. तेव्हापासून आजतागायत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सभागृहाचा ताबा नोंदणीकृत संस्था असलेल्या संघाकडे देण्यात यावा, या मागणीसाठी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व सर्व संबंधित जबाबदार पदाधिकारी-अधिकारी यांच्याकडे वारंवार खेटे घालून, निवेदने देऊनही अद्याप न्याय मिळत नसल्याने संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी उपोषण करून शासन यंत्रणा व प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
स्वच्छता मोहीम राबवून केली गांधीगिरी
By admin | Updated: October 3, 2015 23:51 IST