लासलगाव : गारपिटीने व वादळी पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून, नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी आणि गारपीटग्रस्तांचे पंचनामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊन येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम तातडीने जमा केली जाईल व शेतकऱ्यांसाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी केली.शनिवारी दुपारी राधामोहन सिंह यांनी निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द, वनसगाव, उगाव या गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.सिंह यांनी गारपीट हा चिंतेचा विषय असून, महाराष्ट्रात खासकरून नाशिक जिल्ह्यातील खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांनी लोकसभेत हा प्रश्न गांभीर्याने मांडल्याने मी नाशिक येथे पाहणी करण्यासाठी आलो असून, कृषी खात्याचे दोन्ही राज्यमंत्री हे राजस्थान व उत्तर प्रदेशच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या अनेक विमा योजना आहेत; मात्र या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे . येत्या एप्रिलपासून शेतकरींचे हित जोपासण्यासाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. केंद्र सरकारने हातात कारभार घेऊन केवळ नऊ महिने झाले असून, अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या असल्याने शेतकऱ्यांनाही भरघोस मदत देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.पाहणी दौऱ्यात राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, आमदार अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप, सुरेशबाबा पाटील, दिलीप बनकर आदि उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्ज माफी, वीजबिल माफी, शासकीय कर, शैक्षणिक फी माफीची मागणी सिंग यांच्याकडे केली. निफाडचे आमदार अनिल कदम यांनी मतदारसंघातील शेतकऱ्याच्या व्यथा तीव्र असून, ते चालू अधिवेशनामध्ये सरकारच्या निदर्शनास आणून दिले असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वाढीव बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घालून शासनाकडे मागणी केली जाईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)