नामपूर : बागलाण पंचायत समितीतील गटशिक्षण अधिकारी बी. टी. पाटील यांची बदली करण्याच्या मागणीसाठी अनेक निवेदने देऊन तसेच पंचायत समितीच्या सभेत ठराव होऊनही त्यांच्या बदलीकडे दुर्लक्ष होत असल्याने १५ डिसेंबरपासून उपोषण करणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते यांनी दिली. दरम्यान, बागलाण पंचायत समितीच्या सभेत गटशिक्षण अधिकारी पाटील यांची बदली व्हावी, असा ठराव करण्यात आला आहे.पाटील चाळीसगाव तालुक्यात गटशिक्षण अधिकारी असताना ५५ लाख रुपयांच्या गणवेश घोटाळ्यात त्यांची चौकशी झाली होती. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांची बदली करण्यात आली. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी ते दीड वर्ष गैरहजर होते. असे असतानाही ते या महत्त्वाच्या पदावर कसे, असा सवालही विसपुते यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातही अधिकार नसताना त्यांनी १६ बदल्या केल्या असून, या बदल्याही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सदर बदल्या करताना आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या लेटरहेडचा सर्रास गैरवापर झाल्याचा आरोपही विसपुते यांनी केला आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या वार्षिक तपासण्या केवळ नाममात्र केल्या असून, कोठेही शेरे अथवा साक्षऱ्या नाहीत, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून, ढिसाळ प्रशासनामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. असे असताना त्याच्याकडे कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविल्याची माहिती विसपुते यांनी दिली. (वार्ताहर)
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठरावाकडे दुर्लक्ष
By admin | Updated: November 24, 2015 21:31 IST