घोटी : प्रचंड पाऊस आणि धरणाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यालाही यंदा पावसाने दगा दिला. एकीकडे पावसाचा हंगाम संपत आला आहे तर दुसरीकडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणी साठा कमी होत आहे. परिणामी तालुक्यावर पाणीसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची भिस्त असलेल्या दारणा धरणातून गेल्या काही दिवसात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने या धरणातील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काळात धरणालगतच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जून महिन्यात दगा दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सरासरी ओलांडली आणि भावली धरण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण भरून वाहू लागले होते.तर दारणा धरणात तब्बल ८० टक्के पाण्याचा साठा झाला होता. मात्र धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वातंत्र्य दिनापर्यंत या धरणात पूर्णपणे साठा करता येत नसल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.दरम्यान यानंतर पाऊस पडलाच नाही. परंतु धरणातून पाण्याचा विसर्ग चालूच ठेवल्याने पाणीसाठा घटला असून ८० टक्यावरून तो पन्नास टक्क्यांवर आला आहे.सुमारे दोन हजार मिलीमीटर पाऊस होऊनही इगतपुरी तालुक्यातील धरणसाठयात अपेक्षित वाढ झाली नाही.मुंबईची तहान भागविणा-या वैतरणा धरण परिसरातही पावसाने ओढ दिल्याने अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात मुंबईलाही पाणीटंचाईचा सामना करावा लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर आतापर्यंत साठलेल्या मुकने,कडवा व दारणा धरणातील पाणीसाठयाचा विसर्ग करण्यात आल्याने या धरणालगतच्या भातशेती व बागायती शेतीच्या सिंचनाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. (वार्ताहर)दारणा धरणआजचा साठा ३९३२ द.ल.घ.फु.विसर्ग १००० क्यूसेसटक्केवारी ५५भावली धरणसाठा १४३४ द.ल.घ.फुविसर्ग २६ क्यूसेसटक्केवारी १००
पाऊसदारणा आजचा पाऊस ० मिमी= एकूण पाऊस ७३३ मिमीघोटी आजचा पाऊस ५ मिमी= एकूण पाऊस २५४३ मिमी.इगतपुरी आजचा पाऊस:- १४ मिमी.एकूण पाऊस २०६७ मिमी.भावली आजचा पाऊस २० मिमी,एकूण पाऊस २००८ मिमी.