घोटी- इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे आज सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. खैरगाव येथील शिदवाडीमधील काळू सोमा शिद हे आपल्या कुटुंबासह राहतात.ते आपल्या मुलासह गावाजवळील शेतावर रहातात. तर वाडीत असणाºया घरात त्यांची पत्नी भीमाबाई काळू शिद (६५) राहत होत्या.आज सकाळी या घराला अचानक आग लागली.या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करीत संपूर्ण घराला वेढा घालीत घर आगीच्या भक्षस्थानी पडले.या आगीत भीमाबाई ही वृद्धा होरपळून जागीच ठार झाली. दरम्यान, आगीची माहिती समजताच घोटी टोल नाक्याच्या अग्निशामक बंबानी आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत घर बेचिराख झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल पुरे, घोटीचे सहायक पोलीस निरीक्षम पंकज भालेराव,उपनिरीक्षक आनंदा माळी, हवालदार धर्मराज पारधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे केले.
इगतपुरी तालुक्यात घराला आग लागून वृद्धेचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:20 IST