नाशिक : इंदिरानगर येथील बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बोगदा रुंदीकरणाचा उपाय सुचविला आहे. रुंदीकरण करणे अशक्य नाही, परंतु व्यवहार्यही नाही. कारण रुंदीकरण करायचे झाले तर उड्डाणपूलच तोडावा लागणार आहे. तज्ज्ञांनीच याबाबत मत व्यक्त केले आहे. त्यामुळे बोगदा खुला न करण्याच्या मानसिकेत असलेल्या आयुक्तांकडून हेतुपूर्वक अशक्यप्राय उपाय सुचवून नागरिकांना हतबल केले जात असल्याचेच चित्र दिसत आहे. मुंबई-आग्रा रोडवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असलेल्या या विक्रमवीर पुलाच्या अडचणींमुळे नागरिक मेताकुटीस आले आहेत. त्यातच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळून गोविंदनगरला जोडणारा उड्डाणपुलाखालील बोगदा हा सध्या वादाचा विषय बनला आहे. दोन भागांना जोडणाऱ्या या बोगद्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलीस आयुक्तांनी अन्य कोणतीही उपाययोजना करण्यापेक्षा वाहतुकीसाठी बोगदा बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठीच त्याचा वापर सुरू ठेवला. त्यामुळे वाहतुकीला मोठा वळण घ्यावा लागत असल्याने इंदिरानगर आणि अन्य भागातील नागरिक त्रस्त आहेत.
...तर बोगद्याच्या रुंदीकरणासाठी उड्डाणपूलच तोडावा लागेल!
By admin | Updated: August 4, 2015 23:45 IST