लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यास सत्तेतून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या अभियानाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकार, तसेच भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, सत्ता मिळूनही भाजपा सत्तापिपासू झाली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. तूरखरेदीतील घोटाळ्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना सरकार शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.केंद्रात व राज्यात सत्ता मिळूनही भाजपा सत्तापिपासू झाली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. म्हणजे पक्ष वाढविण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाला ज्या शेतकऱ्यांच्या बळावर आपण सत्तेवर आलो त्यांच्या वेदना, दु:ख दिसत नाही. शेतकरी आत्महत्त्या करताहेत, त्यांचे कुटुंब उद््ध्वस्त होत आहे, अशा परिस्थितीत मध्यावधी निवडणुकीची चाचपणी करणाऱ्या भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार राज्यातील सरकार स्थिर ठेवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देतील, अशी घोषणा ठाकरे यांनी केली.तूर खरेदीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, सप्टेंबर महिन्यातच केंद्र सरकारचे सल्लागार असलेले अरविंंद सुब्रह्मण्यम् यांनी यंदा तुरीचे बंपर पीक येण्याची शक्यता व्यक्त करून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. राज्यात पिकलेली सर्व तूर खरेदी करू असे सांगणाऱ्या सरकारने नंतर शेतकऱ्यांची तूर घेऊ, पण व्यापाऱ्यांची नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या शेतीचे मॅपिंग करूनच तूर खरेदी केली जाईल अशी सबब पुढे करून शेतकऱ्यांनाच घोटाळेबाज ठरविल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तूर खरेदी घोटाळ्यातील खरा गुन्हेगार शोधायचाच असेल तर तुरीचे बंपर उत्पादन येऊनही परदेशातून तूर आयात करण्याचा निर्णय घेणाऱ्याला शिक्षा करा, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली, त्यामुळेच निवडणुकीत शेतकरी शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला, म्हणायला सरकार बदलले, परंतु चेहरा मात्र तोच तो असल्याची खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविली. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांची भाषा काय होती, असा सवाल करून सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री मात्र ‘अभ्यासू विद्यार्थी’ झाल्याचा टोला त्यांनी लावला. समृद्धी महामार्गाच्या विषयावर बोलताना ठाकरे यांनी, राज्यातील दोन राजधान्या जवळ याव्यात, असे वाटणे साहजिकच असले तरी, आपल्या स्वप्नाची पूर्तता करताना दुसऱ्याच्या घरावर वरवंटा फिरविणार असाल तर शिवसेना तो फिरवू देणार नाही, समृद्धीत जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, अशी घोषणा करून, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कोणाच्या फायद्यासाठी केली जात आहे, असा सवाल केला. राज्यातील शेतकऱ्यांपुढे असंख्य प्रश्न व समस्या उभ्या असताना सरकार नेमके कशाला प्राधान्य देते याचा विचार करण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली तर यांच्या खिशाला भोके पडतात, अशी टीका केली. राज्यातील शेतकरी जोपर्यंत शेतकरी म्हणून मतदान करणार नाही, तोपर्यंत त्याला न्याय कधीच मिळणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी देशाला पोसणारा शेतकरी आज कटोरा घेऊन सरकारच्या दरबारी याचकाच्या भूमिकेत आहे, याला सर्वस्वी दळभद्री सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा पिकविलेला माल थेट बाजारात विक्री करण्याचे समारंभ साजरे केले गेले तर त्याच शेतकऱ्यांना कांदा व तूर रस्त्यावर जाळण्याची वेळ का आली? असा सवाल करून यापुढे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असून, त्यासाठी पुढच्या एका महिन्यात बांध, शिवारात जाऊन पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी शेतकऱ्यांची भेट घेतील तसेच आपण स्वत:ही जून महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी बाहेर पडणार व त्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनावर शेतकऱ्यांचा लॉँगमार्च काढण्यात येणार असल्याची घोषणाही शेवटी उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रामदास कदम, रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील, डॉ. दीपक सावंत, दीपक केसकर, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, दादा भुसे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनंत गिते यांच्यासह सेनेचे राज्यातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कर्जमुक्ती नसेल तर खात्यावर १५ लाख द्या !उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नोटाबंदी व मन की बात या विषयावरून पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. नोटाबंदी केल्यानंतर एटीएमसमोर सामान्यांच्या रांगा लागल्या, शेतकऱ्यांकडे नोटांचे स्पष्टीकरण मागण्यात आले. त्यामुळे नोटाबंदीच्या विरोधात मलाच बोलावे लागले असे सांगून, परदेशातून काळापैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकण्याची घोषणा कशासाठी केली, असा सवाल ठाकरे यांनी विचारला व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू नका, परंतु हिंमत असेल तर त्यांच्या खात्यावर १५-१५ लाख रुपये टाका, असे खुले आव्हान पंतप्रधान मोदी यांना दिले.
कर्जमुक्ती दिल्यास आम्ही सत्ता सोडू
By admin | Updated: May 20, 2017 02:30 IST