नाशिक : पाच वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे हात एकाच वेळी तबल्यावर पडतात... अन् ‘धा तिरकीट धा, धाती धाधा तीना’ असा कायद्याचा नाद अवघ्या परिसरात घुमू लागतो... एकशे पंचाहत्तर वादकांकडून रसिकांना मिळणाऱ्या या अद्भुत अनुभूतीत अवघे भाविक तल्लीन होऊन जातात...काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाअंतर्गत ‘तालचक्र’ या आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन आज काळाराम मंदिर येथे करण्यात आले. कार्यक्रमात शहरातील सर्व संगीत क्लासेसच्या १७५ लहान-मोठ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिक तबलावादन केले. छोट्या गटात १२५, तर मोठ्या गटात ५० विद्यार्थ्यांचा समावेश होता. यात सुमारे २५ मुलींनीही सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची संकल्पना नितीन पवार, नितीन वारे यांची होती. प्रारंभी तीनतालातील लेहऱ्याची दोन आवर्तने, ठेके, कायदे, पलटे, रेले, तुकडे सादर करण्यात आले. नंतर विलंबित लयीतील नगमा, पढंत, चक्रदार, फर्माइशी चक्रदार, गत, परण आदि वादनाचे निरनिराळ्या प्रकारांचा कलाविष्कार झाला. एकाच वेशभूषेतील वादकांच्या सारख्याच लयीत तबल्यावर थिरकणाऱ्या हातांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. प्रमोद भडकमकर, गिरीश पांडे, सुजित काळे, रसिक कुलकर्णी, दिगंबर सोनवणे, रूपक मैंद यांनी संगीतसाथ व संयोजन केले. पवार तबला अकादमी आणि आदिताल तबला अकादमी व ऋग्वेद तबला अकादमीच्या शिक्षकांनी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त अॅड. अजय निकम, मंदार जानोरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
शेकडो बोटांमधून ‘धा तिरकीट धा...
By admin | Updated: March 22, 2015 23:37 IST