दिंडोरी : वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांच्या बिलाची आकारणी वाढीव दराने केल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक, मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात वाढीव बिले देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आज देशातील सर्वसामान्य जनता कोरोनाने पिचली आहे. राज्यामध्ये दुबार पेरणी, खत-औषधांची टंचाई, महागाई, बोगस बियाणे, बेरोजगारी या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. वाढीव बिले देऊन कंपनीने अन्याय केल्याची भावना ग्राहकांमध्ये व्यक्त झाली आहे.आंदोलनात दिलीप जाधव, वसंत थेटे, योगेश बर्डे, योगेश तिडके, वसंत कावळे, सुखदेव खुर्दळ, गणेश हिरे, राकेश शिंदे, संतोष गायकवाड, खंडेराव संधान, अजित कड, कचरू पाटील जाधव, संपत जाधव, अभय सूर्यवंशी, सचिन कड, रावसाहेब पाटील आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.------------------अन्यथा, आक्रमक पवित्राआज जनतेला आधार देण्याची गरज असताना पेट्रोल-डिझेलच्या रूपाने केंद्र शासन व वीजबिलांच्या रूपाने राज्य शासन जनतेची लूट करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तीन महिन्यांचे वीजबिल शासनाने माफ करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्र मकपणे रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला आहे.-----------आज महाराष्ट्रभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत कंपनीने ग्राहकांना वाढीव वीजबिल देऊन जखमेवर मीठ चोळले आहे. दिल्ली सरकारप्रमाणे महाराष्टÑ सरकारने तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे व वीजबिलांची दरवाढ मागे घ्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी शासनाकडे साकडे घालण्यासाठी आंदोलन करण्यात आले.- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
दिंडोरी तहसीलसमोर वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:25 IST