त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील तळवाडे केंद्रातील सर्व शाळांच्या शिक्षकांनी वर्गणी करून तालुक्यातील गोरगरीब दिव्यांग बांधवांना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे दिव्यांग बांधवांना दोन वेळचे अन्न मिळणे मुश्कील झाले आहे. हातावर पोट भरणारे हवालदिल झाले आहेत. त्यांना जगण्याची उमेद मिळावी व त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा या उदात्त हेतूने हा उपक्रम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. गटशिक्षण अधिकारी राजेंद्र शिरसाट यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत तळवाडे केंद्रातील शिक्षकांनी, स्वयंप्रेरणेने वर्गणी जमा करून त्यांच्या केंद्रात असणारे दिव्यांग, निराधार, वृद्ध, गरीब अशा व्यक्तींना धान्य, किराणा तथा जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.साहित्य वाटपाच्या वेळी काही शाळेच्या ठिकाणी पेठ व त्र्यंबकेश्वरचे पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, गटशिक्षण अधिकारी राजेंद्र शिरसाठ, तळवाडे येथील सामाजिक कार्यकर्ता तानाजी बोडके, तळवाडेचे केंद्रप्रमुख धनराज वाणी, याशिवाय प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व शिक्षक जगदाळे, सोनगिरे, रवि देवरे, शैलेश आहेर, तुरकणे, गांगुर्डे, संतोष शार्दुल आदी उपस्थित होते.-------तळवाडे केंद्रातील एकूण चौदा शाळांतील एका शिक्षकाने जाऊन सदर साहित्य दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविले. लााभार्थींची नावे त्या त्या गावातील शिक्षकांनी निश्चित केली होती. तळवाडे, बेझे, पिंपरी लहान, पिंपरी मोठी, चाकोरे, गाजरवाडी, मोहिमेवाडी, अंजनेरी, वाढोली, खंबाळे मुळेगाव, हिरडी, पोंगटवाडी, भोकरवाडी वरील गावातील१०८ गरजूंना सदर किटचे वाटप करण्यात आले.
शिक्षकांच्या वर्गणीतून दिव्यांगांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:48 IST