नाशिक : गेल्या १२ वर्षांपासून टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक बाबा बोकील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टेबल टेनिस स्पर्धेचे नियमित आयोजन केले जाते; मात्र यंदा कोरोनामुळे स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेत दोन होतकरु खेळाडूंना मदतीचा हात दिला.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय खेळाडूला या स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान दिला जातो. स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूला स्मृतिचिन्ह , फिरता चषक आणि रोख पारितोषिक देण्यात येते.
या स्पर्धेत प्रामुख्याने शाळा- कॉलेजचे खेळाडू सहभागी होत असल्यामुळे स्पर्धा आयोजित करणे शक्य नव्हते; परंतु गेल्या बारा वर्षांपासून या स्पर्धेशी संलग्न असलेल्या क्रीडा संघटकांच्या एकमताने सदर स्पर्धेला वितरित करण्यात येणाऱ्या रोख पारितोषिकाची रक्कम व्हॉलिबॉलची होतकरू खेळाडू प्रिया घुगे तर ग्रामीण आदिवासी भागात सुरगाणा येथे विविध मैदानी खेळाचे प्रशिक्षण देणारा दिनेश पागी या दोघांना प्रत्येकी रोख रुपये एकवीसशे रुपये देण्यात आले. प्रिया घुगे ही चहाच्या गाडीवर काम करून शाळाही करून कुठलीही शिकवणी न लावता चांगल्या मार्काने पास होऊन दररोज सायंकाळी यशवंत व्यायाम शाळेच्या मैदानात व्हॉलिबॉलचा सराव करते. तर दिनेश पागी हा सुरगाणा येथे उपलब्ध असलेल्या तालुका क्रीडा संकुलामध्ये परिसरातील सुमारे २०० खेळाडूंना सकाळ - सायंकाळ विविध खेळांचे प्रशिक्षण देतो.
या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, रवींद्र मेतकर, आनंद खरे, शशांक वझे, नितीन हिंगमिरे, संजय मालुसरे, अविनाश ढोली, राजू शिंदे, अविनाश खैरनार, संदीप शिंदे आदी क्रीडा संघटक उपस्थित होते. तर रवींद्र मेतकर यांनी बाबा बोकील यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
फोटो (२८बाबा बोकील)
प्रिया घुगे आणि दिनेश पागी यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, दीपक पाटील, आनंद खरे, शशांक वझे, रवींद्र मेतकर, नितीन हिंगमिरे, अविनाश ढोली, संजय मालुसरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे, संदीप शिंदे आदी.