▪️तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल
तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल
देवगाव (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुष्य नक्षत्राच्या पावसाने हाहाकार माजविल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून देवगाव परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे देवगाव येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन तब्बल २४ तास उलटूनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याने देवगावकरांना ऐन पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे.
पुष्य नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधारेमुळे वीज पुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली आहे. देवगावसह वावीहर्ष, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी परिसरात मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची नदी ओहोळांवर चांगलीच झुंबड उडत असून मासेमारी करणाऱ्यांची चंगळ झाली आहे. पाच ते सहा दिवसांपासून रात्रंदिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे आवणा-आवणांमध्ये पाणी साठून देवगाव परिसर जलमय झाला आहे.
---------------------------
शेतीच्या कामांना ब्रेक
देवगाव परिसरात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने घरांच्या छपरातून पाणी झिपरत असल्याने बहुतेक नागरिकांच्या घरांमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. पावसाच्या वेगाची तीव्रता खूप असून त्यात वारा वादळामुळे नागरिकांना थंडीत कुडकुडत बसावे लागत आहे. कोसळणारा पाऊस सतत चालू असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना ब्रेक दिला आहे. जोरदार पावसाच्या आघातामुळे देवगाव येथील वीज पुरवठा तब्बल दोन ते तीन दिवसांपासून खंडित झाल्याने देवगावमध्ये अंधार दाटला आहे.
--------------------
विद्युत पुरवठा खंडित
एकीकडे पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रात्रीच्या काळोखात दिवस काढावे लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून मुसळधार पावसाच्या दिवसात काळोखात रात्र घालवावी लागत आहे. महावितरण विभागाने त्वरित उपाययोजना करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.