येवला : शहरात पावसाने शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह सुमारे ४० मिनिटे दमदार हजेरी लावली. पोळा सणाच्या दिवशी अचानक आलेल्या पावसाने शहरवासीयांची एकच धांदल उडाली. वातावरणात सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. परंतु पाऊस येईलच अशी शास्वती नव्हती. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ झाली. ४० मिनिटे झालेल्या पावसाने शहरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. परंतु ममदापूरसह ग्रामीण भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पोळा सणाच्या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी काहीसा सुखावला आहे. आता पाऊस पडता झाला परंतु त्याने सातत्य ठेवायला हवे, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने नागडे रेल्वेगेट चौकीजवळ रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सणानिमित्त वाडी-वस्तीवरून शहरात पूजेसाठी बैल घेऊन येणारे शेतकरी शेतकरी झाड पडल्याने रस्त्यावर अडकून पडले होते. परंतु पोलीस राजेंद्र बिन्नर व भाऊसाहेब टिळे यांनी नागरिकांच्या मदतीने झाड रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. बैलपोळ्याच्या पोलीस व नागरिक यांनी दाखवलेल्या समय सुचकतेमुळे बळीराजाला बैलासह वेळेवर आपल्या गावाकडे परतता आले. वाहतुकीत अडकलेल्या प्रवाशांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
येवला शहरात पावसाची दमदार हजेरी
By admin | Updated: September 12, 2015 22:33 IST