नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सातही तहसीलदारांनी मॅटमध्ये दाखल केलेल्या अपिलाची बुधवारी सुनावणी होणार असून, त्याकडे महसूल खात्याचे लक्ष लागून आहे. राज्य विधिमंडळ अधिवेशनात याबाबतची घोषणा झाल्यानंतर मे महिन्यात राज्य सरकारने जिल्ह्णातील सातही तहसीलदारांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले होते. सरकारच्या या आदेशाविरुद्ध तहसीलदारांनी मॅटमध्ये धाव घेऊन शासनाच्या कार्यवाहीला आव्हान दिले आहे. १ जून रोजी यासंदर्भात सुनावणी करताना मॅटने तहसीलदारांच्या रिक्त जागांवर नव्याने नेमणुका न करण्याची सूचना सरकारला करून या प्रकरणावर अंतिम सुनावणी १० जून रोजी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी तहसीलदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावर राज्य सरकारने चौकशी समिती नेमून या समितीने पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे बंधनकारक केले होते. या समितीची चौकशीही पूर्ण झाली असून, बुधवारच्या सुनावणीत सरकारकडून या चौकशी समितीचा अहवाल मॅटपुढे सादर केला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
तहसीलदारांच्या निलंबनावर आज सुनावणी
By admin | Updated: June 10, 2015 00:04 IST