नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेली पुनर्मूल्यांकन पद्धत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून, मंगळवार (दि. १०) पासून विद्यापीठासमोर उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या बेस्ट आॅफ टु गुणदान पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. आरोग्य विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाची सुविधा बंद करून दोन परीक्षकांनी तपासलेल्या गुणांचा मध्य काढून गुणदान देण्याची पद्धत सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक फटका बसल्याने दोन वर्षांपूर्वी विद्यापीठात मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांपासून ते वैद्यकीय शिक्षण विभाग, विधी व न्याय खात्यालाही हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर विद्यापीठाने ‘बेस्ट आॅफ टू’चा पर्याय अवलंबत पुनर्मूल्यांकन फक्त एका वर्षासाठीच विशेष बाब म्हणून मान्य केले होते. बंद झालेल्या पुनर्मूल्यांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अजूनही अन्याय होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, पुनर्मूल्यांकन पद्धत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी राज्यभरातील विविध विद्याशाखेचे विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी सर्व शाखांचे वैद्यकीय महाविद्यालये बंद करण्याचीदेखील हाक दिली आहे.
पुनर्मूल्यांकन प्रश्न पुन्हा पेटणार आरोग्य विद्यापीठ
By admin | Updated: March 10, 2015 01:29 IST