दिंडोरी तालुक्यात आजपावेतो एकूण ४०५२ रुग्ण बाधित झाले असून त्यात ७५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. आजमितीस ९८२ रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यात बोपेगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये ७४ तर वणी येथील कोविड सेंटरमध्ये ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. घरी व खासगी दवाखान्यात ८५५ रुग्ण उपचार घेत आहेत. वणी येथे ३० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू असून अजून ३० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू होताच सुरू होत आहे. दिंडोरी येथे ४५ बेडचे कोविड सेंटरचे काम सुरू आहे . प्रशासनाने बोपेगाव सोबतच पिंपरखेड व आवश्यकता भासल्यास दिंडोरी मविप्र महाविद्यालयात कोविड विलगीकरण कक्ष सुरू करण्याची तयारी केली आहे. दिंडोरी शहरात चार तर वणीत दोन खाजगी कोविड सेंटर सुरू असून येथील सर्व बेड फुल्ल आहेत. सर्वच हॉस्पिटल फुल्ल असून खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा होत असल्याने नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी वणवण फिरत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून रेमडेसिविरचे वाटप सुरू झाल्यावर सर्व हॉस्पिटलमध्ये पुरवठा झाला मात्र मागणी पेक्षा अत्यल्प पुरवठा झाल्याने डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत.
इन्फो
प्रशासनाकडून गावोगावी सर्वेक्षण
दिंडोरी तालुक्यात कसबे वणी येथे सर्वाधिक ९१ रुग्ण असून त्याखालोखाल खेडगाव ८१,दिंडोरी ६८ चिंचखेड ३५ तर उमराळे बु ३६ रुग्ण आहे. सुरुवातीला मातेरेवाडी हॉटस्पॉट बनले होते. मात्र येथे वेळीच नियोजन होत रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात वेळीच निदान न केल्याने आजार अंगावर काढल्याने काही रुग्ण अत्यव्यस्थ होत या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वणी ,मातेरेवाडी, खेडगाव, चिंचखेड, म्हेळूस्के, उमराळे, तिसगाव, करंजवन येथे मृत्यू जास्त झाले आहेत. तालुक्यात रोज रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना करत गावोगाव सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात काही गावांमध्ये अँटिजेन तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४०५२ असून एकूण ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ९८२ आहे.
इन्फो
हॉटस्पॉट गावे
कसबे वणी- ९१
खेडगाव- ८१
दिंडोरी- ६८
चिंचखेड- ३५
उमराळे बु.- ३६