लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्रीय शहरी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्याने शहराला दत्तक घेणारे मुख्यमंत्रीही व्यथित झाले होते. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला नुकतीच भेट दिल्यानंतर यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक आलाच पाहिजे, असे आव्हान महापालिकेपुढे उभे केल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून, देशात सर्वप्रथम आलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराची माहिती घेण्यासाठी आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांना पाठविले होते. दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या शहरी मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत स्वच्छ सर्वेक्षण केले जात आहे. पहिल्या वर्षी ७५ शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक ३१ वा आला होता. यंदा मात्र, ५०० शहरांच्या यादीत नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्याने शहरातील स्वच्छतेवर सर्वांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच या सर्वेक्षणाबद्दल शंकाही घेतल्या गेल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेला भेट देऊन आढावा बैठक घेतली असता त्यात त्यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक पहिल्या दहामध्ये आलाच पाहिजे, अशी तंबी दिल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रश्न आयुक्तांनी गंभीरपणे घेतला असून, देशात पहिला क्रमांक मिळविणाऱ्या इंदूर शहरातील स्वच्छतेची नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे व सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे यांना अभ्यासदौऱ्यावर पाठविले होते. दोन दिवसांच्या या दौऱ्यात अनेक चांगल्या बाबी आरोग्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. त्याबाबतचा सविस्तर अहवाल आरोग्याधिकारी आयुक्तांकडे सादर करणार असून, त्यातील काही चांगल्या उपक्रमांची सुरुवात नाशिकमध्येही होण्याची शक्यता आहे.
आरोग्याधिकाऱ्यांचे इंदूर दर्शन
By admin | Updated: June 10, 2017 01:22 IST