लोहोणेर : वरवंडी येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम हरी चव्हाण यांच्या घरात लहान पाळीव मांजर होते. त्यांचा मुलगा पीयूषचे लहानपासून प्राणिमात्रावर जिवापाड प्रेम. पीयूष इयत्ता पाचवीत आहे. सदर मांजराचा त्याला खूप लळा लागला होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दररोज स्वत:च्या अंघोळीबरोबर मांजराला अंघोळ घालण्यापासून वेळेवर दूध पाजणे, खाऊ घालणे असा त्याचा दररोजचा नित्यक्रम. मागील आठवड्यात दोन मांजरांच्या झटापटीत सदरची मांजर गंभीर जखमी झाली व त्यात ती मरण पावली. एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावर जसे अतीव दु:ख होते त्यापमाणे पीयूषला मांजराच्या निधनानंतर दु:ख झाले. त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी मांजराचा अंतिम संस्कार केला. यावरच न थांबता बरोबर दहाव्या दिवशी दशक्रिया विधीसारखा कार्यक्र म करून अंत्यविधीच्या ठिकाणी नैवेद्य दाखवून पीयूषने केशकर्तन करून आपली प्राणिमात्रावर असलेले प्रेम व्यक्त केले. (वार्ताहर)
मांजरावर त्यांनी केले अंत्यसंस्कार
By admin | Updated: April 16, 2016 22:37 IST