-----------------------
बंधन फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य
सिन्नर : भोकणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त बंधन फाउंडेशन तथा लोकनेते गोपीनाथराव मुंढे ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे गावातील आदिवासी बांधवांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदिवासी वस्तीवरील लहान बालकांना शालेय साहित्य, खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच अरुण वाघ, फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सानप, माजी सरपंच हिरामण भाबड, माजी उपसरपंच शरद सानप, ग्रामपंचायत सदस्य शिवाभाऊ सानप, सदस्य माया सानप, खंडेराव सानप, तात्या पाटील सानप, देवराम दराडे, निवृत्ती रणशेवरे, किसन सांगळे, शांताराम कुऱ्हाडे उपस्थित होते.
---------------------
सिन्नरला रोज ५१ बसद्वारे २९६ फेऱ्या
सिन्नर : कोरोनाच्या महामारीनंतर अनलॉक झाल्यानंतर सिन्नर आगाराच्या ५१ बसद्वारे दररोज २९६ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. ७० टक्के बस पूर्ववत सुरू झाल्या असून टप्प्याटप्प्याने सर्व बस सुरू होणार आहेत. सिन्नर-नाशिक व सिन्नर-ठाणगाव बससेवेला चांगला प्रतिसाद आहे. शिर्डी, नगर, पुणे, मुंबई या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत. दररोज १८ हजार किलोमीटरचा प्रवास सुरू झाला आहे.
-----------------
कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठी बैठक
सिन्नर : कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांची भेट घेऊन चर्चा केली. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपून चालली आहेत. त्यासाठी कडवा कालव्यास आवर्तन सोडणे गरजेचे आहे. धरणात असलेल्या अतिरिक्त पाण्यातून कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ जलसंपदामंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी या वेळी केली.
-----------------
खरिपाची पिके करपू लागली
सिन्नर : या वर्षी पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके करपू लागल्याचे चित्र तालुकाभर पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबिन, मका, बाजरीसह अन्य खरिपाची पिके घेतली आहेत. मात्र या वर्षी महिनाभर पाऊस लांबला. त्यानंतर पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.