निफाड : तालुक्यातील शिवरे येथे ेमंगळवारी ऊसतोड चालू असताना कामगारांना उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे बछडे दिसले. बछडे वनविभागाने ताब्यात घेतले आहे.शिवरे येथे व्ही.एन. नाईक संस्थेच्या माध्यमिक शाळेसमोरील मुख्य रस्त्यापासून अवघ्या २०० ते ३०० फुटावर बाळासाहेब भिकाजी सानप यांचे उसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात सध्या ऊसतोड चालू आहे. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ऊसतोड चालू असताना ऊसतोड कामगारांना उसात बसलेले बिबट्याचे बछडे आढळून आले. त्यानंतर ही घटना येवला वनविभागास कळवण्यात आली. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी.आर. ढाकरे, मनमाड वन विभागाचे वनपाल ए.बी.काळे यांच्या आदेशाने वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक पगारे आदि शिवरे येथे सानप यांच्या शेतात तातडीने दाखल झाले व सदर बछडे ताब्यात घेतले हे बछडे जवळजवळ दीड ते दोन महिन्याचे आहे.बिबट्याच्या मादीस जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सानप यांच्या संबंधित उसाच्या क्षेत्रात पिंजरा लावला आहे. बछड्याच्या मायेपोटी बिबट्याची मादी रात्रीच्या दरम्यान सदर उसाच्या क्षेत्रात येऊ शकते या अंदाजाने हा पिंजरा लावण्यात आला आहे. (वार्ताहर)
शिवरे येथे आढळले बिबट्याचे बछडे
By admin | Updated: June 8, 2016 00:37 IST