जय हो नंदलालकी
गज में आंनद भयो
जय यशोदालालकी
हाथी घोडा पालखी
जय कन्हैयालालकी ...
अशा कृष्णाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाशिक रोड परिसरामध्ये घरोघरी व मंदिरात साध्या पद्धतीने भक्तिभावात सोमवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नाशिक रोड परिसरामध्ये सोमवारी रात्रीपासून श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त घरोघरी सजावट करून भजन करण्यात आले. मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव पूजा व आरती करून साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी एकमेकांना जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. धान्याची पंजरी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अद्यापही मंदिर उघडण्यास व जयंती, सण उत्सव साजरे करण्यास परवानगी न दिल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.
दरवर्षी मुक्तीधाममध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चौव्हाण कुटुंबीयांनीच प्रथेप्रमाणे विधिवत पूजा करून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. इतर श्रीदत्त, श्री साईबाबा व इतर मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जेल रोड वसंत विहार येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्वज्ञ सेवा ट्रस्ट अध्यक्ष श्याम शिंदे, उपाध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, देवीदास शेवलीकर, माधवराव आहेर, राम शिंदे, संजय आहोळ, रामकिशन सोनवणे, पोपटराव आव्हाड, योगेश थेटे, दीपक शेवलीकर, प्रशांत सोनवणे, संतोष थेटे, कल्पेश आहिरे, सागर आहेर, अनिल जाधव, सूरज शिंदे आदींसह भाविक उपस्थित होते. मंगळवारी दिवसभर नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्याकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंगळवारी मंदिरापुढे व इतर ठिकाणी साध्या पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली.
फोटो कॅप्शन
नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण व राधेच्या मूर्तीला करण्यात आलेली सजावट. (फोटो ३१ नाशिक रोड)