नाशिक : पक्षी-प्राण्यांप्रती भूतदया दाखविणारे महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे अज्ञात धनाढ्य मालकाची वाट चुकलेला महागडा ‘रॉटव्हायलर’ जातीचा श्वान सध्या पाहुणचार घेत असून, मूळ मालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ताब्यात असलेल्या या श्वानाचा महापौरांनाही चांगलाच लळा लागला आहे. बुधवारी सायंकाळी महापौर पंचवटीतील एका हॉटेलमध्ये गेले असता हॉटेलचालकाने त्यांना वाट चुकलेल्या रॉटव्हायलर जातीच्या श्वानाची कथा ऐकविली आणि मुळातच पक्षी-प्राण्यांप्रती जिव्हाळा असलेले अशोक मुर्तडक यांनी त्या श्वानाला आपल्या सोबत घेतले. उंचपुरा आणि काळ्या रंगाचा असलेला हा श्वान सध्या महापौरांकडे पाहुणचार घेत असून, त्याच्या मूळ मालकाची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सुमारे ५० ते ६० हजार किमतीचा हा श्वान असून, तो अतिशय आक्रमक प्रवृत्तीचा असतो. महापौरांकडेही अशा जातीचे दोन श्वान असल्याने महापौरांनाही या वाट चुकलेल्या पाहुण्याचा चांगलाच लळा लागला आहे. त्याची व्यवस्थित बडदास्त ठेवली जात असून, मूळ मालकाचा शोध लागल्यानंतर त्याच्या हाती त्याला सुपूर्द केले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
हरवलेल्या रॉटव्हायलरचा महापौरांकडे पाहुणचार
By admin | Updated: April 23, 2015 23:47 IST