दिंडोरी/पांडाणे : गेल्या आठ वर्षांनंतर भरलेल्या दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाचे आमदार नरहरी झिरवाळ, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, कृउबा सभापती दत्तात्रेय पाटील आदिंच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे.ओझरखेड धरणावर दिंडोरी तालुक्यातील वणीसह काही गावे तसेच चांदवड तालुक्यातील ४४ गावे व जिल्ह्याातील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे; मात्र हे धरण पूर्ण भरत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. त्यासाठी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ यांनी पाठपुरावा करत मांजरपाडा- देवसाने प्रकल्पाला चालना दिली होती. मात्र तेही काम रखडले आहे. गेल्यावर्षी तर अत्यल्प साठा झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी आवर्तनही दिले गेले नव्हते त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष या धरणातील साठ्याकडे लागले होते. अखेर आठ वर्षांनी हे धरण सोमवारी पहाटे पूर्ण भरत सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे शेतकरी आनंदी झाले असून, शेतकरी जलपूजन करत आहेत. आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, कृउबा सभापती दत्तात्रेय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, माजी सभापती भास्कर भगरे, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, भास्कर निखाडे, कादवाचे माजी संचालक संजय पडोळ, राजेंद्र उफाडे, श्याम हिरे, डॉ. योगेश गोसावी, डॉ. अनिल सातपुते आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तम जाधव व माजी तालुकाप्रमुख अरुण वाळके यांनीही जलपूजन केले. (वार्ताहर)
ओझरखेड धरणाचे जलपूजन
By admin | Updated: August 12, 2016 22:33 IST