पंचवटी : राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पंचवटी परिसरात पावसाने हजेरी लावली होती. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आडगाव, नांदूर, मानूर मखमलाबाद, म्हसरूळ परिसरात पावसाने हजेरी लावल्याने रस्ते ओलेचिंब झाले होते तर आडगाव शिवारात गारांचा पाऊस पडला.
आडगाव शिवारात झालेल्या गारांच्या पावसामुळे शेतकरी तसेच बागायतदारांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार सायंकाळी साडेसहा वाजता वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होताच काहीवेळ पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते तर पाऊस सुरू होण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित झाला होता. आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा परिसर, नांदूर, मानूर शिवारात गारांचा पाऊस पडला. अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.