मालेगाव : तालुक्यातील गारपीट-ग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील ग्रामशक्ती संघटनेतर्फे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर शासनाने पंचनामे करून मदत करण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत. तसेच ज्या गावात पंचनामे झालेत तेथील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे झालेले नाहीत. एकीकडे निसर्गाने मार दिलेला असताना दुसरीकडे शासकीय यंत्रणेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टाळले जात आहे. रावळगावसारख्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पंचनाम्यानंतर मदतनिधी आलेला नाही. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर देवरे, रावळगावचे सरपंच भास्कर पवार, कारभारी शेवाळे, खंडेराव अहिरे, मुकेश खैरनार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मदतीपासून गारपीटग्रस्त अजूनही वंचित
By admin | Updated: July 15, 2014 00:50 IST