नाशिक : गुरुपौर्णिमेनिमित्ताने दसककर संगीत परिवारातील संगीत शिष्यांच्या ‘हे गोपाल, हे गोविंद’, ‘दीन दुख हरन देव संतन हितकारी’, ‘सरला सुख संचय माझा’ आदि पदांच्या गायनाने रंगलेल्या स्वरसंध्येने रसिक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी विविध राग गातांना सादर केलेल्या शरण मी तुजसी, कृष्ण मुरारी, भजमन निसादिन शाम सुंदर, आओ आओ शाम या कृष्ण भक्तिगीतांसह गौरी प्रिय नंदना गजानना, जय जय सरस्वती विद्या यासारख्या गुरुमहिमा वर्णन करणाऱ्या संगीत कार्यक्रमांनी नाशिककरांचा अवघा रविवार संगीतमय झाला.निमित्त होते दसककर संगीत परिवारातर्फेआयोजित गुरु पौर्णिमेचे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित गुरु पौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांनी राग बंदिशी, तराणे, अभंग, भजन अशा अनेक रचनांमधून सादर केलेल्या गीतांनी श्रोत्यांची मने जिंकली. सकाळच्या सत्रात औरंगाबादकर सभागृहात ज्येष्ठ संगिततज्ज्ञ पं. प्रभाकर गोविंद दसककर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. प्रारंभी गणपती आरती, आज खेलो श्याम संग होली.., मनमोहन मुरलीवाला, गुरुविना कोण मला जगी तारी... या गीतांसह सिंथेसायजर व हार्मोनियमवर सुरश्री दसककर आणि आर्या सारडा यांनी राग मधुवती, रागश्री वाजवून उपस्थितांची दाद मिळवली. गुरूपूजन गायनामध्ये सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, हिन्दू नृरसिंह प्रभो शिवाजी राजा या गीतांनी संगीत रसिकांची दाद मिळविली. सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी अती मधुर-मधुर सखी मुरली नाद, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आदि अभंग सादर केले. राग रागेश्री वादनाने श्रोते भारावून गेले. प्रारंभी पंडित प्रभाकर दसककर यांना कल्याणी, गौरी, ईश्वरी आणि सुरश्री दसककर यांनी वंदन करून करून गुरु पौर्णिमेनिमित्त आशीर्वाद घेतले.(प्रतिनिधी)
संगीत शिष्यांची स्वर साधनेतून गुरूवंदना
By admin | Updated: August 1, 2016 01:23 IST