सिन्नर : नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना शेड्यूल बॅँकेत स्वतंत्र खाते उघडून धनादेशाद्वारे दैनंदिन निवडणूक खर्च करावा लागेल, या महत्त्वपूर्ण सूचनेसह आचारसंहिता अंमलबजावणीबाबत निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई यांनी मार्गदर्शन केले. सिन्नर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून, सोमवारपासून (दि. २४) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह तहसीलदार मनोजकुमार खैरनार, सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, अभियंता नितीन परदेशी, सुनील शिंदे, रवींद्र देशमुख आदि व्यासपीठावर उपस्थित होते. सरदेसाई, खैरनार व दुर्वास यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी, छाननी, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, चिन्ह वाटप यांची माहिती दिली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालिकेत बॅँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार असून, नोंदणीकृत पक्षाचा एबी फॉर्म नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा करावा लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आॅनलाइन उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर भरावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व अनामत रक्कम पालिकेत जमा करावी लागणार आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षाद्वारा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एका सूचकाची आवश्यकता आहे, तर नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच सूचकांची आवश्यकता असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नगरसेवक निवडणुकीसाठी दोन हजार रुपये अनामत असून, राखीव जागेसाठी एक हजार रुपये अनामत भरावी लागणार आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने त्यासाठी एक हजार रुपये अनामत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत एकूण निवडणूक खर्च जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. निवडणुकीत प्रार्थनास्थळांचा वापर करता येणार नाही. खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवर पूर्व परवानगीशिवाय ध्वज, फलक, सूचना लावता येणार नाही. प्रचार फेरी किंवा निवडणुकीकरिता जास्तीत जास्त तीन वाहने वापरता येतील. प्रचार कार्यालयांच्या संख्येवर मर्यादा नसून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवता येईल. सभेसाठी प्रस्तावित जागा व वेळेची ४८ तास अगोदर अर्ज करून परवानगी घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक विजय जाधव, बापू गोजरे, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, शैलेश नाईक, मेहमूद दारुवाला, शीतल कानडी, विनायक सांगळे, सुनील केकाण, भाऊसाहेब शिंदे, पंकज जाधव, नामदेव कोतवाल, राजाराम मुरकुटे, रवींद्र काकड, राहुल बलक, ईलियास खतीब, शरद शिंदे, अनिल कर्पे, सविता कोठुरकर, काशीनाथ भालेराव, सोमनाथ पावसे, अनिल जाधव, शरद शिंदे, पिराजी पवार, किरण लोणारे, वामन उकाडे, किरण मुत्रक, कल्पना रेवगडे, राजेंद्र बलक, दीपक श्रीमाळी, रंगा सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
आचारसंहितेबाबत मार्गदर्शन
By admin | Updated: October 22, 2016 01:06 IST