नाशिक : औषधी फळभाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगांचा भाव किलोमागे ४० ते ६० रुपयांनी वधारला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेवग्याच्या शेंगांचीही आवक कमी झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शेवगा ही वनस्पती उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधात आढळते. शेवग्याचे झाड परसबागेत लावणे अशुभ समजले जात असले तरी शेवग्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामुळे बाजारात शेवग्याच्या शेंगांना विशेष करून मागणी असते. गोदाघाटावरील बाजारात शेवग्याच्या शेंगा विक्रीस येतात; परंतु त्यांची होणारी आवक पाहता शेवग्याच्या शेंगा केवळ दोन ते तीन विक्रेत्यांकडेच अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. जून महिना लोटला तरी पावसाने आपली कृपा दाखविली नाही. त्यामुळे बाजारात अन्य फळ व पालेभाज्यांची आवक घटत असताना शेवग्याच्या शेंगांच्या आवकेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. यापूर्वी शेवग्याच्या शेंगा २० ते २५ रुपये पावशेर अथवा २० रुपयांना पाच शेंगा याप्रमाणे विक्री केल्या जात होत्या. मात्र गेल्या काही दिवसांत शेवग्याच्या शेंगांच्या दरात वाढ झाली असून, ३० ते ३५ रुपये पावशेर या दराने त्यांची विक्री केली जात आहे. शेवग्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे या शेंगांना मोठी मागणी असते. (प्रतिनिधी)
शेवग्याच्या शेंगांचा वधारला भाव
By admin | Updated: July 5, 2014 00:15 IST