नाशिक : मुक्त विद्यापिठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘जनसंपर्क’ अनियतकालिक ाचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.गंगापूररोडवरील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन.सुर्यवंशी, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, विभागीय संचालक डॉ. प्रकाश देशमुख, विभागप्रमुख प्रा.श्रीकांत सोनवणे व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना अग्रवाल म्हणाले, पत्रकारिता एक वेगळ्या वळणावर आली असून आव्हानात्मक वातावरणाशी ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीचा या चौथा स्तंभाचा खरा श्वास जनतेचा विश्वास आहे. समाजाचे प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या व संवदेना जागृत करणाऱ्या पत्रकारितेची आज गरज आहे. माहिती व ज्ञान या दोन भिन्न बाबी असून त्यामधील फरक समजून घेत जबाबदारीचे भान ठेवून पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करावा. समाजातील उणिवा व चुकीच्या बाबी प्रकाशझोतात आणल्या नाही तर पत्रकारिता सबळ होऊ शकत नाही.