पांडाणे : दिंडोरी तालुक्यात परतीच्या पावसाने दररोज जोरदार हजेरी लावल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत. दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, अंबानेर माळेदुमाला, सागपाडा, अहिवंतवाडी, चामदरी व कोशिंबे, पिंपरखेड, दहीवी, टाक्याचा पाडा परिसरात गेल्या पाच दिवसांपासून रोज तीन वाजल्यापासून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात जोरदार पाऊस होत असल्यामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.आॅगस्ट महिन्याच्या छाटणीनंतर आज फ्लॉरीग स्टेजमध्ये व आॅक्टोबर महिन्यातील गोडाबार छाटणीचे पीक टोपणात व काही शेती द्राक्षघड टोपणातून बाहेर निघून द्राक्षघड जिरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे व रोजच पाऊस येत असल्याने द्राक्षपिकावर डावण्या व भुरी घडकुज अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्षपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
इगतपुरीत रिमझिम पाऊस
इगतपुरी तालुक्यात रविवारी रिमझिम पावसाने बहुतांश ठिकाणी हजेरी लावली; मात्र शनिवारी झालेल्या पावसामुळे घाटमाथ्याच्या परिसरात दरडी कोसळल्या; मात्र सध्या फारसा पाऊस न झाल्याने रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. शनिवारी सायंकाळी इगतपुरी तालुक्यात घाटमाथ्याच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने दरडी कोसळून काही काळ वाहतूक खोळंबली होती; मात्र रविवारी अत्यल्प पाऊस झाल्याने घाट परिसरातील रस्त्यावरील वाहतुकीला अडचण आली नाही. तसेच रेल्वेसेवाही सुरळीत सुरू होती. (वार्ताहर)