नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्यासोबतच स्वच्छताग्रहीही कार्यरत असून, अशा स्वच्छताग्रहींना प्रतिबंधात्मक साधने खरेदी करण्यासाठी १०६ ग्रामपंचायतींमधील १६१ स्वच्छताग्रहींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुकास्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतींना सदरचा निधी देण्यात येणार असून, या व्यतिरिक्त स्वच्छताग्रहींना एक हजार रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छताविषयक बाबींवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व स्वच्छताविषयक ग्रामपंचायत स्तरावर जाणीव जागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंसेवक म्हणून एक किंवा दोन असे एकूण २०८४ स्वच्छताग्रही नियुक्त करण्यात आले आहेत. शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या तसेच शहरी भागाच्या नजीकच्या ग्रामपंचायतींची निवड करून तेथील स्वच्छताग्रहींना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींमधील १६१ स्वच्छताग्रहींसाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी प्रतिस्वच्छताग्रही १००० रुपये याप्रमाणे १ लक्ष ६१ हजार रुपयांचा निधी तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला.---------कोरोनाच्या या लढाईत पाणी व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत स्वच्छताग्रही यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. शासन निर्देशानुसार कोरोनाचा प्रत्यक्ष प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रानजीकच्या ग्रामपंचायतींमधील स्वछताग्रहींना आवश्यक साहित्य देण्याचे व विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी
१०६ ग्रामपंचायतींना अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:02 IST