नाशिक : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील नेते अॅड़ गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी मंगळवारी न्यायालयीन कामकाजात भाग न घेऊन आदरांजली वाहिली़ न्यायालयातील जुनी लायब्ररी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी पानसरे संपले असले तरी त्यांचे विचार मात्र कधीही संपणारे नसल्याचे सागून आदरांजली वाहिली़ वकिलांनी न्यायालयीन कामकाज सहभाग न घेतल्याने बहुतांशी न्यायालयात शांतता दिसून आली़ पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा न्यायालयातील वकिलांनी लाल फिती लावून काम केले होते़, तर त्यांच्या हत्त्येचा निषेध तसेच मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी मंगळवारी न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेता आदरांजली वाहण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार मंगळवारी जिल्हा न्यायालयातील कामकाजात वकिलांनी भाग घेतला नाही़ न्यायालयातील युक्तिवाद, साक्षीदार तपासणी अशा सर्वच कामांवर बहिष्कार टाकण्यात आला़ त्यात काही वकिलांनी काळा कोटही परिधान केला नव्हता, केवळ अती महत्त्वाचे व क्रिमिनल मॅटरचेच काम सुरू होते़ जिल्हा न्यायालयातील जुनी लायब्ररी हॉलमध्ये झालेल्या आदरांजली कार्यक्रमात मुंबई व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, अॅड़ जी़ डी़ नवले, अॅड़ आव्हाड, अॅड़ नितीन ठाकरे यांनी पानसरे यांच्या कार्याची माहिती देऊन आदरांजली वाहिली़ यावेळी नाशिक बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी:मागणी
By admin | Updated: February 25, 2015 01:13 IST