नाशिक : महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीला नाशिक येथील विस्तारित इंजिनिओ (झायलो) प्रकल्पास जकात माफीची रक्कम अदा करण्यास महापालिकेने नकारघंटा वाजविल्यानंतर अखेर सुमारे सहा वर्षांनंतर शासनाने महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीवर मेहेरनजर दाखविली आहे. शासनाने महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीला जकात माफीची २६ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २००५-०६ मध्ये नाशिक येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने आपला विस्तारित इंजिनिओ (झायलो) या प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेकडून जकात माफीचा प्रस्ताव शासनापुढे ठेवला होता. सदर प्रकल्पामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होण्याचा दावा करण्यात आला होता, परंतु महापालिकेने कंपनीला विस्तारित प्रकल्पासाठी जकात माफी देण्यास विरोध दर्शविला. या माफीमुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती त्यावेळी सदस्यांनी व्यक्त केली होती. शासनानेही महापालिकेला सदर माफी देण्याचे आदेशित केले होते, परंतु महापालिकेने आपली नकारघंटा कायम ठेवली होती. महापालिकेच्या नकारामुळे नंतर महिंद्राने नाराजीतून आपले काही प्रकल्प चाकणला हलविले होते. दरम्यान, शासनाने महिंद्रा कंपनीशी दि. १६ आॅगस्ट २००६ रोजी सामंजस्य करार करतानाच करमाफीची अधिसूचना काढली होती. महापालिकेने मात्र नवीन प्रकल्पाच्या भांडवली यंत्रसामुग्रीवर १०० टक्के दराने जकात आकारली तसेच प्रकल्पात उत्पादन सुरू झाल्यापासून म्हणजे दि. १ डिसेंबर २००८ पासून ते नगरविकास विभागाने दि. ५ डिसेंबर २००९ रोजी काढलेल्या अधिसूचनेपर्यंत कच्च्या मालावरही ०.५ टक्के व्यतिरिक्त जकात आकारली होती. महापालिकेने महिंद्राकडून वसूल केलेली रक्कम परत करण्यास वारंवार विरोध दर्शविला होता. अखेर तब्बल सहा वर्षांनंतर महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करत महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीला जकात माफीची २६ कोटी ७५ लाखांची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
महिंद्रा कंपनीवर शासनाची मेहरनजर
By admin | Updated: November 9, 2015 23:23 IST