नाशिक : बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसतो आहेच, परंतु सरकारी तसेच बॅँक कर्मचाऱ्यांनादेखील बसणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर न केल्यामुळे सर्व शासकीय कार्यालय आणि राष्ट्रीयीकृत बॅँका सुरूच राहणार आहेत. परंतु ठिकठिकाणी असणारे बॅरिकेडिंग आणि वाहनास मनाई यामुळे कर्मचाऱ्यांना याठिकाणी पोहोचावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुट्टी घोषित न केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.पहिली पर्वणी शनिवारी (दि.२९) होणार आहे. या पर्वणीसाठी रामकुंड परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहेच, परंतु अन्य रामकुंडाकडेच नव्हे तर अन्य अनेक ठिकाणी खासगी वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती भागातील नो व्हेइकल झोनमुळे येथे वाहन आणता येणार नाही. शिवाय महापालिकेच्या मुख्यालयासारख्या मध्यवर्ती भागात नसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना नो व्हेइकल झोन किंवा बॅरिकेडिंगमुळे कसे येता येईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी कामामुळे कामावर जाणे आवश्यक आहे, परंतु जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनीच इतके अडथळे घालून ठेवले की कामावर कसे जावे हा प्रश्न आहे. वास्तविक, इतक्या संपूर्ण शहरात निर्बंध लागू करण्यात आल्याने आणि कुंभमेळ्याचा संबंध नसलेल्या भागातही परिवहन महामंडळाची शहर बस वाहतूक बंद असल्याने शासकीय कार्यालये किंवा राष्ट्रीयीकृत बॅँकामध्ये कोणी नागरिक कामासाठी येण्याची शक्यता धुसर आहे, परंतु तरीही कर्मचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करीत जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार हाल
By admin | Updated: August 28, 2015 23:41 IST