घोटी : पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे यांची कॉँग्रेस पक्षाने पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयानुसार लहांगे यांना सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू डुकरे यांनी दिली. याबाबत पक्षश्रेष्ठींना कळविण्यात आले आहे.इगतपुरी पंचायत समितीत कॉँग्रेस व मित्रपक्षाची सत्ता असून, पक्षीय बलाबलमुळे कॉँग्रेस पक्षाचे गोपाळ लहांगे हे सभापती आहेत. मात्र सभापती लहांगे यांनी आपल्या पदाचा दुरु पयोग करून पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना शिवीगाळ केल्याच्या कथित प्रकरणामुळे लहांगे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या विरोधात संपूर्ण जिल्ह्यातून कर्मचारी संघटनेचे आंदोलने होत आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने तसेच लहांगे हे जबाबदार लोकप्रतिनिधी असतानाही गत विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले असल्याचा आरोप कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या कारणास्तव त्यांना पक्षातून सहा वर्षांकरिता बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कॉँग्रेस कमिटीच्या झालेल्या बैठकीत देण्यात आली.दरम्यान, या प्रकरणाबाबत कॉँग्रेस पक्षाची तातडीची महत्त्वपूर्ण बैठक घोटी येथे संपन्न झाली. या बैठकीत पक्षाची प्रतिमा मलीन करण्यास जबाबदार असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन लहांगे यांच्या बडतर्फीचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या बैठकीस तालुकाध्यक्ष कचरू डुकरे, ज्येष्ठनेते तथा माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, मधुकर कोकणे, पांडुरंग शिंदे, संपतराव काळे, भास्कर गुंजाळ, निवृत्ती खातळे, बाळासाहेब वालझाडे, पांढरी लंगडे, राजेंद्र जाधव आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.(वार्ताहर)
गोपाळ लहांगे कॉँग्रेस पक्षातून बडतर्फ
By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST