अंबड लिंक रोडने फिर्यादी इंदुमती प्रमोद गोळे (५०, रा. मुक्ताई सोसायटी, कामटवाडे) या मंगळवारी (दि.२) रात्री १० वाजेच्या सुमारास उत्तमनगर येथील शुभमपार्कसमोरून मुख्य रस्त्याकडे पायी जात होत्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव दुचाकीने आलेल्या चोरट्याने मानेवर थाप मारून गळ्यातील सोनसाखळी बळजबरीने हिसकावून धूम ठोकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध दाखल केला आहे. कधी धावत येत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून चोरटा फरार होतो, तर कधी दुचाकीने येत मानेवर थाप मारून सोनसाखळी हिसकावून घेत चोरट्याकडून पलायन केले जाते. मात्र, अंबड पोलिसांना या तीनही घटनांपैकी एकाही घटनेत संशयित चोरटा हाती लागत नाही, हे विशेष! यामुळे मध्यवर्ती गुन्हे शाखा किंवा गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकांनी सिडको भागात लक्ष केंद्रित करत सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. कारण मागील तीन दिवसांपासून दररोज अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडकोमधील विविध नगरांमध्ये महिलांच्या साेनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना घडत आहेत. अंबड पोलिसांची गस्त, खबऱ्यांचे नेटवर्क, गुन्हे शोध पथकाची कार्यवाही पूर्णपणे ढेपाळल्याचे चित्र यावरून दिसून येते.
सिडकोत सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST