नाशिक: महिनाभरापासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला असून टोळीयुध्दाचा भडका असो अथवा गुंडांची दहशत अशा विविध प्रकारांमधून खूनसत्र सुरूच असल्याने नाशिककर भयभीत झाले आहे. दोन दिवसांपुर्वी भर दिवसा त्र्यंबकरोडवर एका गॉगल विक्रेत्याला गॉगल खरेदीदरम्यान दर कमी करण्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. धारधार शस्त्रांनी हल्ला चढविल्यामुळे विक्रेता एहतेशाम इर्शाद अन्सारी (२३, रा.महेबुबनगर, वडाळा) हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. उपचारादरम्यान अन्सारीचा मंगळवारी (दि.१३) उपचारादरम्यान मृत्यू झाला.शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाच ते सहा युवकांचे टोळके अन्सारीच्या गॉगलविक्रीच्या स्टॉल्सवर आले. यावेळी गॉगल खरेदीवरून खटके उडाले आणि टोळक्याने अन्सारीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याला प्राण गमवावे लागले आहे. भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर होत असलेल्या मारहाणीच्या घटनेबाबत पोलिसांना कुठलीही माहिती मिळू शकली नाही हे विशेष. तसेच आजुबाजुच्या नागरिकांनी देखील याबाबत हस्तक्षेप केला नाही किंवा पोलिसांनाही कळविले नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. एहेतेशामवर वडाळारोडवरील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मेंदूला जबर मार लागल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले आहे. दीड ते दोन वर्षांपासून एहेतेशाम हा आपल्या पत्नीसोबत वडाळागावात राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. त्याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळी त्याच्या निधनाची बातमी समजताच वडाळागाव परिसरातील त्याच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अज्ञात हल्लेखोरांविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा शनिवारी प्यारेमिया अन्सारी यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे स्वरुप आता पोलिसांनी बदलले असून संशयित हल्लेखोरांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.अटकेची मागणी; नागरिकांची संतापहल्लेखोर तीन दिवसांपासून फरार असून पोलिसांना नावेही तपासात समोर आली आहे; मात्र अद्याप एकाही हल्लेखोराला अटक करण्यास पोलिसांना यश आले नसल्याने उपस्थित जमावाने पाटील यांच्याकडे अटकेची मागणी केली. यावेळी शेकडो नागरिकांनी पाटील व सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांना घेराव घालत अद्याप हल्लेखोर फरार का? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. शहरातील या गुंडांच्या मुसक्या आवळणार तरी कधी असा सवाल करून संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थितांची समजूत काढत हल्लेखोरांच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.शस्त्रांचा खुलेआम वापर; शहरात दहशतनाशिकमध्ये मागील महिनाभरापासून गुंड प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून शस्त्रांचा संबंधितांकडून खुलेआम सर्रास वापर केला जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असतानाही दुचाकींवर गुंड शस्त्र बाळगून मिरवतात कसे?हा मोठा प्रश्न आहे. पोलीस केवळ कागदपत्रे तपासून किंवा एखाद्या संशायित दुचाकीस्वार किंवा चारचाकींची झडती घेत का नाही? असा प्रश्न नाशिककर उपस्थित करीत आहेत.खाकी हतबल; गुन्हेगारांचे फावलेनाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील रस्त्यांवरुन चालणेदेखील सुरक्षित राहिले नसून पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या खूनाच्या घटना, मारहाण, लुटमार, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत.